Tuesday, May 13, 2008

बघ परत एकदा परतून ५

आज घोंघावतायत सारे जुनेपुराणे

शल्य, बोचरे काटे, ओरखडे न दिसणारे

व्रण बघितला की जखम आठवते

माणूस बघितला की वृत्ती आठवते

तोंडदेखलं हसायची करून घेतलेली सवय

मनाचे झालेले तुकडे, परत परत फ़सायची सवय

गिळलेला राग, कोंडलेला श्वास , निसटलेले क्षण

माणसांच्या तऱ्हा, खोटी नाती , आप्तगण

वाऱ्या तुला सांगते, ने सगळं दूर कुठेतरी

पावसा तुला मागते, टाक वाहून सारं सागरतळी

सारं काही परत सांधायला निघालीये

द्या मला साथ मन परत बांधायला निघालीये

दीपा

बघ परत एकदा परतून ४

स्वप्नांच्या कुशीत शिरलं ना

की एक नवी उभारी मिळते

कारण स्वप्नांना चौकट नसते

त्याला फ़क्त भावना कळते

ये माझ्या स्वप्नात, जिथे फ़क्त तू आणि मी

उधाणलेला तू , आणि भरकटलेली मी

परत एकदा सारं पसरून टाकू

जपून ठेवलेलं सारं उधळून टाकू

दे भिरकावून साऱ्या जनरीती

खेळ माझ्या बटांशी आठव जुनी प्रीती

वादळ शमलेलं असलं तरी अजून झुळुक हवीहवीशी आहे

स्वप्नं डोळ्यात असली तरी मी पण जरा दमलेलीच आहे

दीपा

बघ परत एकदा परतून ३

तुझी माझी पहिली भेट आज आठवते

कल्याण दरवाज्यावरुन तू शिरलेला थेट आठवते

तू अजून तसाच बेफ़ाम , बेलगाम, बंधनं झुगारणारा

मीच तुला टाळत गेले, माझ्याभोवती रीती-भातींचा पसारा

तुझं वेगाशी नातं नि माझं पाऊल अडखळलेलं

तुझा सर्वत्र संचार नि माझं जग चौकटीत बांधलेलं

केसांना विस्कटायचास म्हणून बांधून टाकायचे

तुझे भासही नकोत म्हणून खिडकी लावून टाकायचे

आज मात्र तुझ्यासाठी दार सताड उघडं टाकलयं

कवेत घेऊन मला पाला-पाचोळ्यासारखं भिरकावून दे

वादळ बनून ये आणि सारं काही उरलंसुरलं उचलून ने
अनुभवू दे मला पुन्हा एकदा तो वेग, एक नवं वळण दे

दीपा

बघ परत एकदा परतून २

अरे पावसा , तुला रे कसं विसरेन

आठवते आपली दोस्ती अंगणातली

धुमारे फ़ुटण्याच्या कोवळ्या वयातली

जुन्या दोस्तांना का कोणी विसरतं ?

पण माप ओलांडलं नि अंगण तुटलं

स्वप्न साबणाच्या बुडबुड्यासारखं फ़ुटलं

वळचणीच्या पाण्यासारखं सारं साठलं

त्याला रे कुठली धार नि कुठला प्रवाह

पण येईन म्हणते आता पुन्हा परतून

टाक मला पुन्हा एकदा चिंब भिजवून

वाहणाऱ्या धारांत मीही वाहेन म्हणते

रिक्त होऊन नव्याने स्वप्नं पाहेन म्हणते

दीपा

Monday, May 12, 2008

बघ परत एकदा परतून १

किती दिवस झाले ना

माझे मन धुंदावले नाही

कुठल्या गाण्याने वेडावले नाही

मोगऱ्यानेदेखील गंधाळले नाही

गाणीच चांगली नाहीत अताशा

मोगराही छान फ़ुलत नाही अताशा

आज मला आठवतीये ती अल्लड तू

पोक्तपणाच्या जळमटांमागची हुल्लड तू

पावसाच्या सरीने बेभान होणारी तू

ठेक्यावर थिरकणारी नादान तू

क्षितिजाकडे पाहात हरवणारी तू

चांदण्या डोळ्यात जागवत निजणारी तू

तेव्हाही तुला विचार होतेच

आता त्याची मतं झालीयेत

तेव्हाही तुझी आवड होतीच

आता मात्र तुझी निवड ठरलीये

तुझी रसिकतेची छिद्रं बुजलीयेत

दारं बंद करुन घेतलीस गीतं कुजलीयेत

बघ परत एकदा हात पसरुन

पाउस देईल तुला तुझं तळं

बघ परत एकदा खिडकीत बसून

आभाळ अजून आहे तसंच निळं

नव्या जाणीवेने बघ मोगरा हुंगून

खात्री आहे मला तो टाकेल मोहरून

बघ परत एकदा परतून

सापडशील बघ स्वत:ला

बघ तर परत एकदा हरवून

दीपा

Sunday, May 11, 2008

mom

Mothers Day
आमच्या घरी एक झाड आहे

त्याला पाणी नसलं तरी चालतं

पण फ़ुलं कोमेजली तर कोसळतं

तसं प्रत्येकाच्या घरी असतं

ते ना कल्पवृक्षासारखं दिसतं

आपल्या प्रत्येक इच्छा पुर्ण करतं

तुम्हाला सावली देतं

ऊन स्वत:वर झेलतं

फ़क्त त्याच्या फ़ुलांना

धक्का लावू नका

तसं ते खंबीर आहे पण

फ़ुलांच्या बाबतीत हळवं आहे

सर्वांच्या फ़ारच ओळखीचं

कदाचित त्यामुळेच दुर्लक्षित

त्याचं अस्तित्व गहाण

त्याच्या फ़ुलांच्या कुपीत

मी त्या झाडाला आई म्हणते तुम्ही काय म्हणता ?

दीपा

Happy Mother's Day। This 1 is specially for my mom।

Friday, May 9, 2008

...बोच...


काचा गोळा करुन

डब्यात भरल्या

एक आरसा लावून

नक्षी मांडून बसल्या

प्रत्येक गिरकीबरोबर

एक नवी नक्षी

प्रत्येक फ़िरकीबरोबर

एक चमक अक्षी

बांगडी तुटल्याची

बोच संपली

तुकडे झाल्याची

टोच संपली

दु:ख सजवलं की

किती छान दिसतं

बोच संपली की

फ़क्त चित्र उरतं

वेगवेगळ्या कोनातून

वेगळं दिसणारं

आयुष्याच्या चित्रात

रंग भरणारं

दीपा