आठवतय आपण शाळेत असताना
एक खेळ खेळायचो
पाची बोट हातात धरून
मधल बोट ओळखायचो
दर वेळी मी हरले की
तू मला हसायचास
अगदी रडवेली झाले की
"वेडी कुठली" म्हणायचास
वेडीच होते मी खरच पण
माझ वेड तुला कळलच नाही
मधल बोट बरोबर ओळखलस
पण हात हातात धरलाच नाहीस
तसाच आहेस तू अजून उंच, उच्च
मधल्या बोटासारखाच वेगळा
आणि मीही आहे अजून तशीच
करंगळीसारखी छोटीशी
दरवेळी वाटायच यावेळी
मधल बोटच सापडणार
तुलाही माहीत असायच
मी याही वेळी फसणार
शाळा संपली खेळ संपला
आपल्या वाटा वेगळ्या झाल्या
वयानुसार नजरा चोरट्या झाल्या
तरीही शोध नाही संपला
वाटल एका बोटाचच अंतर
आहे आपल्या दोघात पण
सगळीच अंतर सारखी नसतात
उच्च-नीच, गरीब-श्रीमंतीची परीमाण असतात
आभाळ आणि धरतीच प्रेम
फ़क्त पुस्तकातच असत
जे फ़क्त क्षितीजालाच मिळत
आणि क्षितीज वास्तवात कधीच नसत
- दीपा