तू गेल्यापासून हे घर
सुनं सुनं झालंय
तुझ्या आठवणी सोडल्या तर
नुसत रिकामपण भरलंय
बसले होते मी एकटीच
एक एक रात्र कापीत
वाटल मीच का अभागी
तर हसला तो चन्द्र शापित
वाऱ्यासमोर उभी होते
हाताने केस सावरताना
गालातल्या गालात हसत होते
तू विस्कटलेले आठवताना
बघितलस का बाहेर
रिमझिमतोय पाउस
अजून तर पूर्ण बरसायचाय
आत्ताच नको ना जाउस
रखरखीत ऊन
टळटळीत दुपार
तुझं कुंकू पुसलेलं
कोरं कोरं कपाळ
दीपा
रोज आधी उठून चहा बनवतोस
आज उठायच नाही का तुला ?
काहीतरी सांगत होतास ना
बोलायच नाहीये का तुला ?
बघ ढग कसे दाटून आलेत
पण बरसत का नाहीयेत
आज सगळेच का जमलेत
आणि हसत का नाहीयेत
ऊठ , ऊठ ना आता
नाटक नको करूस
तिन्हीसांजा झाल्या आता
असा झोपून नको राहूस
लोकं पण ना सगळी
घरभर भरून राहिलेत हो
अन मलाच सांगतायत
रडून घे , मोकळी हो
आज तो एकच ढग
फ़ारच ओळखीचा वाटतोय
सकाळपासून बघतीये मी
सावलीसारखा मागे मागे फ़िरतोय
दीपा
अरे खूप उशीरा कळालं मला
तू निघून गेलायस त्या शरीरातून
जेव्हा लोक आले ना
सहानुभुतीचा बुरखा घेऊन
भावना शून्य, फ़क्त शब्दांचा पाऊस
भिजले नाहीच फ़क्त कोरडी होत गेले
तू गेल्यावर कळल तू किती चांगला होतास ते
लोकांकडून रे
"तो ह्या जगात नाहीये, आता सांभाळ स्वत:ला "
तू फ़क्त शरीर सोडलयस, कसं सोडशील मला
गिधाडं रे सारी घोंघावणारी
प्राण जाण्याची वाट पाहणारी
माझी काळ्या मण्यांची पोत
माझं सुरक्षाकवच होतं रे
आणि भाळीची लाल लक्ष्मणरेषा
आज अचानक हरिणीसारखं वाटतंय
एकाकी आणि असुरक्षित
कवचकुंडलं गळून पडल्यासारखं
माणसांच्या शहरात श्वापदांचा सुळसुळाट
नजरा बदलल्यात , सूचक, वासनांचा थयथयाट
अहेवपणी मरणं का मागतात बायका आज कळतंय ...
सती नाही झाले पण हे जग मला जाळतंय ...
ये ना त्या ढगातून पाऊस बनून
दाह थोडा तरी कमी होईल
दीपा
सावलीत आहेस म्हणालास का ?
वळले , पाहीले, सावली पण वळली
परत माझ्या मागे जाऊन थांबली
फ़िरत राहिले स्वत:भोवती
स्वत:ची शेपटी पकडणाऱ्या कुत्र्यासारखी
घरभर शोधत राहिले तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
काही रुसवे , काही चुका
व्यर्थ शब्द , काही आणाभाका
तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणायचे
तरी जगतीये
सावलीत, ढगात, पावसाच्या थेंबात
तुला शोधतीये
चिंब भिजलो तरी एखादा थेंब असा ओघळतो
सर्र्कन निसटतो नि जीव माझा शहारतो
हा शहारा वास्तवात आणतो
तू नाहीस ह्याची जाणीव होऊन
पाऊस डोळ्यांत साठतो
रडणार नाहीये मी
मोकळं व्हायचच नाहीये तर
पाश असेच राहू देत
सुटका नकोच आहे तर
मोकळा तू झालायस
मी अजूनच अडकत चाललीये
तुझ्यात माझ्यात
दीपा
अजूनही कुंकू लावते
तुझं , पहिल्यासारखं
पण हळदीकुंकवाला केलंय
ह्या समाजाने पारखं
वांझ म्हणणार नाहीत
कदाचित ...
पण तरीही मी
निपुत्रिकच ...
शब्द बदलले तरी
तगमग तीच
कारण बदलले तरी
व्यथा तीच
तळहातावरची रेष थोडीच
बदलता येते
भाळावरचं भाकीत थोडेच
लपवता येते
तुझं देणं न देताच
निघून गेलास
आणि वर मलाच लढ
म्हणून सांगून गेलास
दीपा
नवा श्वास शोध म्हणाला होतास ना
सापडतोय कदाचित
पण आज एक नवं द्वंद्व उभं राहिलंय
एक मन दुसऱ्याविरुद्ध ठाकलंय
तुला विसरले का मी ?
नाही रे राजा ....
मग आता हे नवं स्वप्न
मनात होऊ पाहणारी ही नवी जागा
आज भावनांची सरमिसळ झालीये
ये ना थोडा गुंता सोडवायला
एकटी पडलीये रे खूप
ये ना जरा सावरायला
मन पुन्हा कोणावर जडतं का रे
काळाचं औषध सगळ्यावर चालतं का रे
काय बरोबर काय चूक काही कळेनासं झालंय
प्रश्न वाढत चाललेत उत्तर मिळेनासं झालंय
मी प्रेम शोधतीये का आधार सांग ना रे
एकदा तरी त्या ढगातून बोल ना रे
दीपा
कुंकू नवं
जमेल का रे मला
पुन्हा प्रेम करणं ?
एकाच मनामधे
दोघांचही राहणं
आज आठवतायत परत
आपल्या रेशीमगाठी
साता जन्मांची वचने
आणि सप्तपदी
परत एकदा हळद ओली
परत एकदा मेंदी रंगली
परत एकदा कुंकू नवं
जागा तीच पण नाव नवं
नव्या श्वासात मिसळताना
तुझा भास राहीलच ना
नव्याने क्षितिज पाहताना
चंद्र तोच राहील ना
नवं माप ओलांडताना
आज अडखळतय पाऊल
पुढे बघताना पुन्हा पुन्हा
भूतकाळाची चाहूल
दीपा