Showing posts with label Kavita. Show all posts
Showing posts with label Kavita. Show all posts

Monday, June 30, 2008

"गेले ते दिवस"

काही आठवेनासं वाटायला लागलं

की विचारांच्या तळघरात जाऊन यायचं

हमखास मिळतं बघ हसायचं कारण

किती हसलो आठवून रडायच कारण

"गेले ते दिवस" म्हणायचं, परतून यायचं

तळघराला कुलुप न विसरता लावायचं

पुन्हा जगायला लागायच थांबलोय तिथून

तळघराकडे बघायचं एकदा उसासून

तेवढीच डांबलेल्या भावनांना वाट मिळते

जखमांवर कधी खपली धरते, कधी उलते

दीपा

घरात शिरताच मला कळतं
तू आलायस का नाहीस
तुझी मात्र उगाच लपाछपी
पण तू सापडतोस की नाहीस
उगाच डोळे मिटून पडू नकोस
उगाच जिवाला घोर लावू नकोस
पैज लावतोस का माझ्याशी
यावेळी मी हरायलाही तयार आहे
काय म्हणशील ते देईन
तुझ्यासाठी मरायलाही......
ह्याच्यापुढे बोलूच दिलं नव्हतंस
अगदी नकळत एक वचन घेतलं होतंस
आता तूच वचन मोडून चाललायस
तुझ्याआधी तुला गाठते किनई बघ
एवढं आशाचं गाणं ऐकते बघ
"सलोनासा सजन है और मैं हूं"

दीपा

Wednesday, June 25, 2008

बाईक .. तो .. ती

कधी नव्हे ते आज मला

घरी सोडतो म्हणालास

मलाच वाटल का खरच

गालातल्या गालात हसलास

कुठे गेल्या आज साऱ्या

अवतीभोवतीच्या भवान्या

आज तू राजकुमार आणि

मी तुझी सुंदर राजकन्या

अगदी अलगद सावरत

तुझ्या बाईकवर बसले

आधाराशिवाय चढताना

माझ्या नाकी नऊ आले

कितिदा वाटलं हात ठेऊन

तुला बिलगून बसावे

काहीतरी विषय काढून

कानी काही कुजबुजावे

बेत सारे मनातच राहिले

घरदेखील जवळ आले

कुजबुज कसली बाय म्हणून

राजकुमार आमचे दिसेनासे झाले

दीपा

खूप धीर करून आज

तुला घरी सोडू का विचारले

अशीच आहेस तू लाजरीबुजरी

हो म्हणतानाही ओठ थरथरले

किती दिवस स्वप्न पाहिलं

माझ्या खांद्याला धरून बसशील

गुपित काही कानामधे सांगशील

मीही करीन वाऱ्याचा बहाणा

जवळ ये काही ऐकू येईना

रेशमी स्पर्शाने मोहरून जाईन

माझ्यासारखी तुझीही कळी खुलून जाईल

.

.

स्वप्न सारं आठवताना

तुझे घर जवळ आले

बाय म्हणून निघालो

वाटलं आता तरी बोलशील

मी पाऊल उचललंय

सांग ना तू कधी पुढे येशील ?

दीपा

Friday, June 20, 2008

माझी होणार का?

चहा घेणार का ?

इतक्या सहजतेने

माझी होणार का ?

विचारलस

हा कोण कुठला

ओठी सहजतेने

नकार येऊन गेला

गुंतवलंस

नकार मी दिलेला

तरी टाळत गेले

मला तुझ्या नसण्याने

झपाटलंस

परत दिसलास

ओळखीचं हसलास

काही घडलच नाही

दाखवलंस

पाहिलं तपासून

दु:ख दिसतय का

कुठून हसू आणून

फ़ुलवलंस

सुरु सारं नेहेमीचं

तरी ते वळण ओळखीचं

विषय निघता निघता

वळवलंस

झालं थंड सारं

प्रीत केलीस व्यक्त

बर्फ़ाखालच्या नदीला

कुठे दडवलंस

दीपा

Monday, June 16, 2008

अधांतरी

सुस्वागतम ही कविता मी आधी लिहिली होती घटस्फ़ोटातून जाणाऱ्या नवऱ्याच्या भुमिकेतून। आज अचानक ती जागी झाली ... आणि अधांतरी काहीतरी सांगून गेली।

माप ओलांडून आले तेव्हा

तुझा हात गच्च धरला होता

आज सोडवताना ठेचकाळले

बघ ना हाच तो उंबरा होता

काडी काडी जमवून आपण

चिमुकलं घरटं उभं केलं

दोन काड्या माझ्याही आहेत

फ़क्त "जप" म्हणून सांगितलं

प्रेम अजूनही तूच आहेस

संसाराची गणितं नाही जमली

सुरावट ठेक्यात असूनसुद्धा

मैफ़ील खाशी नाही रंगली

घट्ट आवळलं की मिठीतसुद्धा

जीव गुदमरतोच रे

सोन्याचा असला ना तरी

पिंजऱ्यात राघू तडफ़डतोच रे

नाव नाही बदलायचं म्हणून

तुझ्याशी भांडले होते

तेच तुझ्या ओठी येताच

रोम रोम मोहरले होते

परतीचा प्रवास जास्त जीवघेणा

ह्या नावाकडून त्या नावाकडे

अस्तित्वाचे विखुरलेले तुकडे

ह्या गावाकडून त्या गावाकडे

माहीत आहे मला अजून

दारातच तू उभा असशील

कोपऱ्यावर वळताना तरी बघेन

म्हणून तसाच ताटकळला असशील

नाही बघणार मी वळून

ओलांडलंय उसनं अवसान आणून

सुखी राहा निदान तू तरी

मी ना इकडची ना तिकडची

माझी फ़रफ़ट अशीच अधांतरी

दीपा

बदल २

मग सध्या काय करता तुम्ही ?

केटरिंग्च्या व्यवसायात आहोत आम्ही

अरे वा मग बायकोची मजा आहे

नाही अजून गृहखातं तिच्याच ताब्यात आहे

केटरिंग मी व्यवसाय म्हणून करतो

घरातलं स्वैपाकपाणी तिच्यावर सोडतो

नाही तसं अडलंनडलं करतो साथ

कधी वेगळी करी कधी मसालेभात

पण रोज स्वैपाक करण्याएवढे वाईट दिवस नाही आले

शेवटी पुरषांना ही काही मान आहे समजले ??

दीपा

Sunday, June 15, 2008

बदल १

ह्या रविवारी तू घरी आहेस का ?

का विचारतीयेस कुठे जायचं आहे का ?

ठाण्याला एक कविसंमेलन आहे

मी नको म्हंटलं तरी मैत्रीणींनी नाव दिलं आहे

स्वैपाकपाणी सारं करून जाईन

दुपारी चारपर्यंत परत येईन

फ़क्त जरा पिल्लूकडे बघशील

हा रविवार जमणार नाही म्हणून मित्रांना कळवशील

जाऊन ये बिनधास्त, आगे बढो

टाळ्य़ा घेऊन ये , लगे रहो

चारपर्यंत ये परत , माझा कट्टा आहे आज

पिल्लूची काळजी करू नको, बापाच्या ताब्यात आहे आज

ठीक आहे म्हणून ती निघून गेली

गेली खरी पण मला विचारात टाकून गेली

.

.

आठवले अनेक रविवार तिला गृहीत धरलेले

मित्रांचे अड्डे, न सांगता घरी जमवलेले

समानतेची भाषा करणारा, जाणणारा मी

आठवत नाही तिची परवानगी घेतली का मी

कट्ट्यावर गप्पा मारायला जाताना

ऑफ़ीसच्या मीटींग जुळवताना

माझी सगळी कामं झाल्यावर माझा अर्धा वाटा आहे का ?

तिच्या वाट्यासाठी वेळकाळाचं काहीच बंधन नाहीये का ?

खरच सांगा मला मी आधुनिक आहे का ?

बंधनं सांभाळूनही ती मुक्त आहे का ?

दीपा

Saturday, June 14, 2008

मला नाही भिजायचं

का सारखा त्रास देतोयस ?

सांगितलं ना नाही भिजायचं

बरस हवा तेवढा नाही बघायचं

जिथे तिथे थैमान घातलंयस

दारापर्यंत येऊन गेलास

खिडकीतून डोकावून गेलास

सगळीकडे साचलास

गाण्यांमधून नाचलास

बातम्यांमधूनही पोचलास

नेहमीचं झालंय तुझं

तुझ्या मनाप्रमाणे वागायचं

आणि मी तुझ्या तालावर झुलायचं

यावेळी नाही फ़सणार

यावेळी मी कोरडीच राहणार

बघू आता कोण जिंकतय

बरसून बरसून कोण थकतंय

;

;

थांब जरा

फोन खणखणला

अरे शिरपा तू?

कसा आहेस ?

लई खुष आहे ताई

वरूणदेवाची किरपा झाली

औंदा भाकर मिळेल, पेरणी झाली

हुरड्याला यायला इसरू नगा

कैक दिसानं पाटातून वाहतया पाणी

सारी त्या राजाची करणी

.

.

हा गडगडाट का मला कळत नाही

यंदा तर भिजवलंस पुढल्या वर्षी बघून घेईन

दीपा

Friday, June 13, 2008

रजोनिवृत्ती

कोवळी हिरवी पालवी होतीस

खुललीस, फ़ुललीस, रक्ताळलीस

भारावलीस, जडावलीस, सुखावलीस

निसर्गाचं दान पदरात घेत गेलीस

आयुष्याच्या ह्या अर्ध्या टप्प्यावर

आज तो पुन्हा परतून आलाय

त्यावेळी द्यायला आला होता

आता परत मागायला आलाय

हिरवा रंग कधीचाच उडाला

लाल परत मागायला आलाय

तुझं स्त्रीत्व घेऊन चाललाय

अर्धच झालंय सांगून चाललाय

ही तुझी उदासी, ही चिडचिड

सारी त्या बदलाची निशाणी

ताटातूट झालेली स्त्रीत्वाशी

अशी ओठी येणारच गं विराणी

आठव ती अधुरी ध्येयक्षितिजं

आणि त्या अपुऱ्या स्वप्नशलाका

नव्याने सुरु कर तुझी कहाणी

पुन्हा नव्याने गा जुनी गाणी

तुझं हे तेजोवलय अनुभवांचं

सुंदर चमचमतं सोनेरी रंगांचं

विसरून जा भूतकाळ काळा कुट्ट

मुक्त हो, पिल्लं - घरटं हे पाश फ़क्त

तुलाही हक्क आहे निवडण्याचा

नक्की काय हवं ते ठरवण्याचा

ते वेचलेले सोनेरी कण उधळत जा

नव्या तेजाने ह्या अर्ध्याला सामोरी जा

दीपा

Thursday, June 12, 2008

पिवळा लाल पांढरा

लाल आहे

मग पिवळा लाल

लाल आहे

मग पिवळा लाल

निळा ??

ठीक आहे

पिवळा लाल

परत लाल

मग पिवळा लाल

रंगच नाही

अरे बापरे

आता काय करायचं

कुणाला विचारू ?

गळ्यात काळा रंग नाही

हा मग पांढरा

चला पुढे

परत लाल

मग पिवळा लाल

दीपा

एक छोटी मुलगी आहे। लग्नाचा प्रसंग , एक जण पेढा वाटते एक जण हळदी - कुंकू लावते। आईने तिला सांगितलय डोक्याला लाल कुंकू असेल तरच लावायच. आता तिच्या मनात फ़क्त रंग आहेत

लाल आहे

मग पिवळा लाल

लाल आहे

मग पिवळा लाल

एका बाईने मॅचिंग टिकली लावलीये निळी ... ठीक आहे पिवळा लाल आता एक विधवा बाई बसलीये डोक्याला कुंकू नाही मुलीला प्रश्न पडतो। गळ्यात मंगळसूत्र नाही. ती ठरवते हा पांढरा रंग. पुढे जायच

परत पिवळा लाल

मानसिकता कशी घडत जाते ते मांडायचा हा प्रयत्न

Wednesday, June 11, 2008

काळी मैना ३

तुझं नाव ऐकलं तेव्हाच मोहरून गेले

तूच तो असे मन्मनी कितिदा येऊन गेले

एका न पाहिलेल्या राजकुमाराची स्वप्ने

मन माझे वेडे तुझ्यामागे धावत गेले

वेडी होते, भेटीसाठी दिवस मोजत गेले

तुला पाहण्याची हुरहुर हळूच लपवत गेले

साऱ्यांसाठी नेहमीचा माझ्यासाठी खास

"बघायला येण्याचा दिवस" धडधड उगाच

तू नुसतंच न्याहाळलंस, दुरूनच एकवार

रुपावरून परीक्षा, जाणलेच नाहीस विचार

माझ्या उत्तराची कोणाला गरजच नव्हती

आडून कळवला गेला तुझा मला नकार

परत एक नवीन नाव मी परत मोहरले

कदाचित हा "तो" असेल मनात येऊन गेले

आशा थोडी मावळलेली नवा हुरूप आणून गेले

नाव गाव बदलून सारे वृत्ती तीच दावून गेले

दरवेळी प्रसंग तोच पात्रे मात्र बदलून गेली

हवापाणी, रस्ते खड्डे, गप्पा त्याच मारून गेले

राजकुमाराचे स्वप्नं हळूहळू विरघळून गेले

जग असं निर्दय एक भयाण वास्तव दावून गेले

मुलगी नाही मुलगा आहेस बाबा सांगत गेले

आज मात्र मी त्यांना "का?" प्रश्न विचारत गेले

रोज रोज नव्या स्थळांनी बाबा डायरी भरत गेले

पत्रिका , मंगळ असे किनारे लोकही शोधत गेले

परत एक नवीन नाव, मी यांत्रिक होत गेले

वाट बघणे, मोहरणे, कधीचेच हरवून गेले

"पाहायचा दिवस" वेळापत्रकात भरून गेले

नेहमीच्या सवयीने स्मितहास्य करून गेले

दीपा

काळी मैना २

बास आता सारं बास झालं

विसरुन जाते झालं गेलं

रंग हा निकष असेल तर

मीच नाकारते हा हात

सृजनाच्या चार क्षणांसाठी

अस्तित्व गहाण मागतात

सुखाच्या संसारासाठी

आयुष्याचं दान मागतात

नसेल पंखात गरुडाचं बळ

पण मनात हिंमत आहे

एकटं असलं तरी एकाकी नाही

आयुष्य खूप सुंदर आहे

गरज तर तुला आहे

एकदा मनात डोकावून बघ

मी तर स्वयंसिद्धा आहे

तूच एकटा राहून बघ

दीपा

Tuesday, June 10, 2008

काळी मैना १

एक काळी मैना असते

सारे जग तिला हसते

गोरं व्हायचं स्वप्न बघून

हळदीत थयाथया नाचते

तीच काळी मैना आता

मनुष्यजन्मात येते

गोड गुलाबी स्वप्नं बघून

हळद लागायची वाट बघते

’फ़ेअर ऍन्ड लव्हली’ लावते

काळा रंग गव्हाळ झाला का बघते

पुर्वजन्मी बगळे तिला हसायचे

आमच्यात यायचं तर हो आधी

’सुंदर गोरी सडपातळ’

याजन्मीही अपेक्षा तीच

फ़क्तं विशेषणं वाढलीयेत

’सुशिक्षित, मनमिळावू , समजूतदार’

आणि असंच काही बाही

मैना बिचारी हळदीच्या शोधात

आत्ताशी कुठे पाय पिवळे झालेत

अजून किती जन्म हे असंच चालायचं?

दीपा

आवडती ... नावडती

एक आटपाट नगर होतं

नगराचा एक राजा होता

राजाला दोन राण्या होत्या

एक होती आवडती , एक नावडती

.

.

.

अशा कित्येक गोष्टी ऐकल्या

राजा आला की दोन राण्या आल्या

एक राजा मग राण्या दोन का?

असले प्रश्न त्या बालमनाला पडलेच नाहीत

कायम त्या नावडतीला जाच का ?

असलं काही त्या वेळी सुचलंच नाही

पेराल तसं उगवतं

गोष्टीतून संस्कार रुजवतो

स्त्रीवादी स्त्रीमुक्ती हे झाले मनोरे

पाया चुकीचा घातलात त्याचं काय ?

मातीच्या गोळ्याला आकार दिलात काट्याचा

आता ते बोचणारच

झालेल्या संस्कारागत वागणारच

रंगरंगोटी करून त्याचं फ़ूल होईल काय ?

गुंता खूपच मोठा आहे

एक टोक तरी शोधायलाच हवं

सगळ्यात आधी गोष्टींमधून

दोन राण्यांना काढायलाच हवं

दीपा

व्यक्त

तू कोण ठरवणार रे मी कधी रडावं

तू का गृहीत धरतोस मी सतत हसावं

कधी कधी साचलेलं निचरतच नाही

मलाही लगेच मोकळं व्हायची घाई नाही

मला फ़क्त माझ्या मनाप्रमाणे जगायचंय

आला कंटाळा तर त्यातच बुडायचंय

झाला आनंद तर बाळासारखं हसायचंय

अगदी निष्क्रिय वाटलं तर नुसतं बसायचंय

तू राहा ना असाच माझ्या अवतीभोवती

सांग मला तुझ्या सुख दु:खाच्या गोष्टी

सांगीन तुला मला काय आवडतं काय खुपतं

पण थांब तिथेच , नको अडवूस होऊ दे व्यक्त

कधी म्हणशील एवढ्याशा गोष्टीत रडायचं काय ?

मला समजावून सांग यात हसण्यासारखं काय ?

नाही समजावून सांगू शकत हे मनाचे झोके

नक्की नाही सांगू शकत कधी वाढतात ठोके

मला विचारतोस तुला दु:ख आवडतं का ?

सांग त्याच्यासारखी सोबत दुसरं कुणी करतं का?

सुखाचं अप्रूप असतं त्याच्या प्राप्तीपर्यंतच

हातात आलं की त्याचं कौतुक उरतं का ?

दीपा

Monday, June 9, 2008

व्यक्त ..... अव्यक्त

पाहिलयं कधी निसर्गाला व्यक्त होताना ?

मळभ दाटून आल्यावर धुवाधार बरसताना ?

ढवळून निघाल्यावर ज्वालामुखीला फ़ुलताना

पूर आला तरी नदीला ओसंडून वाहताना

मग माझ्यासाठी का संयमाचा अट्टाहास ?

का सारे नियम? इथे हास , तिथे हो उदास

कधी मृत्यूही दगडाचं काळीज होऊन झेलते

कधी साधं बोलणंही जीवघेणे सलते

वाहावं नदीसारखं कधी होऊन गुप्त

तर कधी प्रपातासारखं खळखळतं

नको टाळूस सारं काही करु दे व्यक्त

नको खोदूस काही बाही राहू दे अव्यक्त

घातलायंस कधी निर्बंध वाहणाऱ्या वाऱ्याला ?

सांगितलंयस पावसाला मूड नाही भिजण्याला

वाहू दे मला पुरेपूर अश्रूतून, कवितेतून

वाटू दे थोडं एकटं , उदास , मनातून

नको म्हणू नकोस सारखं सारखं

आधारही देऊ नकोस सारखा सारखा

जाऊ दे भिरभिरत तुटलेल्या पतंगासारखं

होऊ दे थोडं तरी व्यक्त त्या अव्यक्तासारखं

दीपा

Friday, June 6, 2008

तेव्हा ...... आता

अल्लड ..... बालपण

उधाणतं ..... यौवन

गगनचुंबी ..... स्वप्नं

लहरत्या ..... आशा

विजिगेषु ..... इच्छा

भुलवणारी ..... प्रीत

संतृप्त ..... समर्पण

जखडणारी ..... रीत

अतृप्त ..... जीवन

अदृश्य ..... बेड्या

स्वत:चं ..... सांत्वन

दार ..... कुलुप-कड्या

विचार ..... मंथन

आता

रम्य ..... बालपण

हवंहवंस ..... यौवन

जळमटलेली ..... स्वप्नं

उसासलेल्या ..... आशा

परतायची ..... इच्छा

रोखणारी ..... प्रीत

सरावलेली ..... रीत

अतृप्त ..... जीवन

अदृश्य ..... बेड्या

स्वत:चं ..... सांत्वन

दार ..... कुलुप-कड्या

विचार ..... मंथन

दीपा

मी का ती ?

स्वप्नांच्या दुनियेत शिरले

डोळे मिटून चालत राहीले

कळलंच नाही क्षितिज कधी

होत गेलं संकुचित, बांधलेले

आता वाटतंय पुन्हा उडावंसं

परत पंख जरा फ़डफ़डावसं

पण नको पंख कधीच हरवले

आहे सुरक्षित, जरी अडकलेले

पुन्हा उडण्याचं बळ आहे का ?

नव्याने झगडण्याचं त्राण आहे का?

ह्या बेड्या सलतात , रुततात

पुन्हा सवयीने पावलांना रोखतात

ती आत्मभान असणारी "मी" संपलीये

सतत कुणाची तरी असणारी "ती" उरलीये

दीपा

Thursday, May 29, 2008

कुठे नाव ऐकलं

तरी थबकते

प्रेम नाही मैत्री आहे

म्हणाले होते

तरी तू का जगावेगळा वाटतोस अजूनही

प्रीत लाभली

संसार दृष्ट लागण्यासारखा

झालं सार काही

चारचौघींसारखं

तरी एखादी सांजवेळ का कातरतोस अजूनही

काळ सरला

मैत्र तरी कुठे उरलं?

जुळले अनेक धागे

झाली अनेक तयार नाती

तरी कविता लिहिताना का आठवतोस अजूनही

दीपा

कळीचं फ़ूल होताना

आज एका कळीचं फ़ूल होऊ पाहतंय

एक पाखरू घरट्यातून उडू पाहतंय

सारखं सावलीत ठेऊन ते फ़ुलत नाही

उन्हाच्या चटक्यांविना रूप खुलत नाही

फ़डफ़डल्याशिवाय पंखांत बळ येत नाही

हुडकल्याशिवाय आपलं आभाळ मिळत नाही

डोळ्यात तेल घालून जपलंय क्षण क्षण

निरांजनाच्या वातीहून सोज्वळ कण कण

कसे समजावून सांगू तुला नजरांचे अर्थ

वासना , विकार , बलात्कार हे सारे शब्दार्थ

तुझी स्वप्नांची दुनिया, तुझी पाटी कोरी

आणि माझ्याकडे बंद एक अनुभवांची तिजोरी

भेटतील काही आधार, कधी निळंशार तळं

रुततील काही काटे , काही फ़सवी मृगजळं

शिकशील तूही, जशी प्रत्येक स्त्री शिकते

अनुभवाशिवाय शिकावीस म्हणून मी झटते

भूतकाळातलं चित्र डोळयांसमोर तरळतंय

माझ्यातल्या आईला आज माझ्या आईचं मन कळतंय

दीपा